Ad will apear here
Next
राम मनोहर लोहिया, मधुवंती दांडेकर, हरकिशनसिंग सुरजित


समाजवादी पक्षाचे प्रभावी कार्यकर्ते म्हणून स्वातंत्र्य चळवळीत आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे राम मनोहर लोहिया, मराठी संगीत रंगभूमीवरील सुप्रसिद्ध गायिका-अभिनेत्री मधुवंती दांडेकर आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते (सीपीएम) व पॉलिट ब्यूरोचे सदस्य कॉम्रेड हरकिशनसिंग सुरजित यांचा २३ मार्च हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
.........
राम मनोहर लोहिया
२३ मार्च १९१० रोजी अकबरपूर, फैजाबाद येथे राम मनोहर लोहिया यांचा जन्म झाला. देशात लोकशाही समाजवादी विचारसरणीचे लोण पसरविणारा स्वातंत्र्य पर्वातील आघाडीचा कार्यकर्ता अशी ओळख असणाऱ्या राम मनोहर लोहिया यांचे शिक्षण कोलकाता, मुंबई आणि बर्लिन येथे झाले. बर्लिनमधून पी. एच. डी मिळवून ते भारतात परतले आणि सरकारी नोकरीचे आमिष लाथाडून स्वातंत्र्याच्या ध्येयप्राप्तीसाठी ‘चले जाव’ आंदोलनात उतरले. 

१९४२ च्या ‘चलेजाव’ आंदोलनादरम्यान झालेल्या प्रतिकार सामर्थ्याचे जनक म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. या आंदोलनादरम्यान आपल्या उपरोधिक शैलीत, विशिष्ट व्यक्ती व घटनांचे विश्लेषण करणारी भाषणे त्यांनी लिहिली. ती गुप्त रेडिओ केंद्रातून प्रसारित होत. १९५५मध्ये त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. १९६३ पासून ते संसद सदस्य होते. समाजवादी चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या लोहियांनी समस्यांच्या संदर्भात स्वदेशी समाजवाद विकसित करण्याची भूमिका मांडली. त्यांनी इंग्रजी आणि हिंदीतून लेखन केले. राम मनोहर लोहिया यांचे निधन १२ ऑक्टोबर १९६७ रोजी झाले. 
.........

मधुवंती दांडेकर
२३ मार्च १९४७ रोजी मधुवंती दांडेकर यांचा पुण्यात जन्म झाला. मधुवंती दांडेकर यांनी अनेक नाटकांमधून प्रमुख भूमिका केल्या. ‘अंगणी पारिजात फुलला’, ‘ऋतुराज आज वनी आला’, ‘तारिणी नववसन धारिणी,’ ‘मधुकर वन-वन फिरत करी गुंजारवाला’, ‘ये मौसम है रंगीन’, ‘जगी हा खास वेड्यांचा पसारा’ ही त्यांची गाणी विशेष प्रसिद्ध झाली व अजरामरही झाली. 

मधुवंती मोहन दांडेकर या पूर्वाश्रमीच्या मंगला लक्ष्मण सहस्रबुद्धे. मधुवंती दांडेकर यांना गाण्याचा वारसा आपली आई मनोरमाबाईंकडून मिळाला. प्राथमिक धडे त्यांनीच गिरवून घेतले. पुढे शास्त्रीय संगीत शिक्षण घेण्यासाठी त्यांना भारत गायन समाज येथे आई-वडिलानी पाठविले. तेव्हा त्यांचे वय होते नऊ वर्षे. अवघ्या १५व्या वर्षी ‘संगीत विशारद’ ही पदवी मिळविली. पुढे पंडित ए. के. अभ्यंकर, स्वरराज छोटा गंधर्व, पंडित यशवंतबुवा जोशी, पंडित राम मराठे, जयमाला शिलेदार अशा अनेक गुरूंचे मार्गदर्शन मिळाले. छोटा गंधर्वांकडून त्यांना शास्त्रीय, नाटयसंगीत, ठुमरी, दादरा व अनेक चिजा इ. मधे मोलाचे मार्गदर्शन लाभले. वयाच्या १८ व्या वर्षी त्यांचे गायक-नट मोहन दांडेकर यांच्याशी विवाह झाला. 

सासर नाटक व संगीत प्रेमी. पतीही गायक-नट. म्हणूनच त्यानी मंगलाचे नाव ‘मधुवंती’ ठेवले. कायम भरघोस प्रतिसाद व प्रोत्साहन मिळत गेले. लग्नानंतर दापोलीतील आंजर्ले गावी दुर्गा देवीच्या उत्सवात या उभयतांनी ‘संगीत संशयकल्लोळ’ केले. 

त्या एक उत्तम लेखिकाही आहेत. स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, प. पू. विमलाजी ठकार, विद्याधर गोखले, छोटा गंधर्व यांच्यावरील त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. मधुवंतीताईंचे गाण्यातील आदर्श म्हणजे नटसम्राट बालगंधर्व आणि आध्यात्मिक आदर्श असलेल्या साक्षात्कारी विभूती परमपूज्य विमलाजी ठकार. विमलाजींच्या अनेक हिंदी पुस्तकांचा मधुवंतीताईनी मराठीत अनुवाद केला आहे. हिंदी भाषेवर त्यांचे चांगलेच प्रभुत्व आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ‘नाट्यधनराशी’या नाट्यसंगीत ध्वनीफीत संचाच्या विक्रमी खपाबद्दल क्लासिक-कॅसेट्स कंपनीतर्फे सुधीर फडके यांच्या हस्ते त्यांना ‘गोल्ड डिस्क’ प्रदान करण्यात आली होती. महाराष्ट्र शासनाच्या वतीने २०१८-१९चा संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारही त्यांना जाहीर झाला आहे.
...........


हरकिशनसिंग सुरजित
२३ मार्च १९१६ रोजी हरकिशनसिंग सुरजित यांचा जन्म झाला. भारतीय राजकारणातील महान नेते, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उत्तुंग पुढारी, पंजाबमधील खलिस्तानी-फुटीरतावादी शक्तीविरोधी जबरदस्त धर्मनिरपेक्ष चेहरा, मार्क्सवादी चळवळीचे प्रेरणास्रोत अशी त्यांची ओळख सांगता येईल. हरकिशन सिंग सुरजित यांनी शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रथम शहीद दिनी म्हणजे २३ मार्च १९३२ रोजी वयाच्या १६व्या वर्षी पंजाबमध्ये जिल्हा कचेरीवर तिरंगा फडकावण्याचा पराक्रम केला होता. 

तिरंगा फडकावण्याबद्दल त्यांना एका वर्षासाठी शिक्षा सुनावली तेव्हा त्यांनी विचारले ‘फक्त एक वर्ष?’ तेव्हा मॅजिस्ट्रेट म्हणाले, ‘४ वर्षं.’ परत त्यांनी तोच प्रश्न विचारल्यावर मॅजिस्ट्रेट ओशाळून म्हणाले, जास्तीत जास्त ४ वर्षं शिक्षा देऊ शकतो. याच कोर्टात त्यांना नाव विचारले असता त्यांनी आपले नाव लंडनतोडसिंग असे सांगितले होते. हरकिशनसिंग यांनी १९९२ ते २००५ या कालावधीत कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे जनरल सेक्रेटरी म्हणून काम केले. हरकिशनसिंग सुरजित यांचे निधन एक ऑगस्ट २००८ रोजी झाले. 

माहिती संकलन : संजीव वेलणकर

(याशिवाय केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, अभिनेत्री कंगना राणावत, ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. विनोद डिग्रजकर यांचाही २३ मार्च हा जन्मदिन. तसेच, मराठी अभिनेते गणपत पाटील यांचा २३ मार्च हा स्मृतिदिन.) 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PUBWCW
Similar Posts
राम मनोहर लोहिया, मधुवंती दांडेकर, स्मृती इराणी, हरकिशनसिंग सुरजित समाजवादी पक्षाचे प्रभावी कार्यकर्ते म्हणून स्वातंत्र्य चळवळीत आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे राम मनोहर लोहिया, मराठी संगीत रंगभूमीवरील सुप्रसिद्ध गायिका-अभिनेत्री मधुवंती दांडेकर, अभिनेत्री व भाजपच्या नेत्या, खासदार स्मृती इराणी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते (सीपीएम) व पॉलिट ब्यूरोचे सदस्य कॉम्रेड
मोहन वाघ, व्ही. बलसारा छायाचित्रकार, नाट्यनिर्माते, नाट्यदिग्दर्शक, प्रकाशयोजनाकार, नेपथ्यकार मोहन वाघ आणि प्रतिभासंपन्न संगीतकार व जागतिक कीर्तीचे पियानोवादक व्हिताज बलसारा उर्फ व्ही. बलसारा यांचा २४ मार्च हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा अल्प परिचय...
अनुताई वाघ, कल्पना चावला, सायना नेहवाल शिक्षणाचा प्रवाह आदिवासी वाड्या-पाड्यांपर्यंत नेणाऱ्या थोर शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ, भारतीय वंशाची अंतराळात जाणारी पहिली महिला कल्पना चावला आणि भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांचा १७ मार्च हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
महादेवी वर्मा, आनंद शंकर हिंदीतील प्रतिभावान कवयित्री महादेवी वर्मा यांचा २६ मार्च हा जन्मदिन. गीतकार व संगीतकार आनंद शंकर यांचा २६ मार्च स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language